पालकमंत्री नितेश राणे, आम. निलेश राणेंचा सहभाग:राष्ष्ट्रप्रेमी नागरिक मंचाचे नेटके आयोजन..
⚡कुडाळ ता.१३-: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा राष्ट्रप्रेमाने ओथंबलेल्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी रॅलीत सहभाग घेत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांची, त्याग केलेल्यांची नेहमी आठवण ठेऊन मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्याचे आवाहन उपस्थितांना केले. रॅलीतील विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. भैरव मंदिरापासून सुरु झालेली हि रॅली एस एन देसाई चौकात झालेल्या छोट्या सभेने विसर्जित झाली.
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर शासकीय स्तरावर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून देशप्रेमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक मंच यांच्या वतीने ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील श्री भैरव मंदिर पासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रस्थानी विविध देशभक्तीपर गीत वाजविणारे वाहन. त्या मागोमाग विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक हातात तिरंगे घेतून आणि गळ्यात तिरंगे स्कार्फ परिधान करून सहभागी झाले होते. बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळेश्वरवाडी, पडतेवाडी शाळा, कुडाळ हायस्कुल, पणदूर हायस्कुल, जीवन शिक्षण मंदिर शाळा अशा शाळेतले विद्यार्थी मोठ्या संख्यने रॅलीत सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्रदेवता, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, झाशीची राणी अशा वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांचे ढोलपथक, विद्यार्थिनींचे लेझीम पथक रॅलीत लक्षवेधी ठरले. रॅलीच्या मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या तिरंगा रॅली मध्ये पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे सहभागी झाले होते. रॅली सोबत एस एन देसाई चौकापर्यंत हातात तिरंगा घेऊन त्यांनी सहभाग घेतला. भैरव मंदिर पासून सुरु झालेली हि रॅली कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून पोलीस ठाणे, कॉलेज रोड येथून एस एन देसाई चौकात येऊन विसर्जित झाली. त्या ठिकाणी छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, त्याग केला आहे, संसाराची राख रांगोळी केली आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वानी प्रयत्न केली पाहिजेत अशे आवाहन यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आमदार निलेश राणे यांनी सुद्धा वर्षाचे ३६५ दिवस देशाचा विचार केला पाहिजे असे सांगितले. विवेक पंडित यांनी तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता देश मोठा करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. प्रभाकर सावंत यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, रॅलीचे मुख्य आयोजक विवेक पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, काका कुडाळकर, संजय पडते, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, संदीप गावडे, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, आरती पाटील, रुपेश कानडे, श्वेता कोरगावकर, विलास कुडाळकर, राष्ट्रपेमी नागरिक मंचचे विवेक पंडित, बंड्या सावंत, मनोज वालावलकर, संध्या तेरसे, रमाकांत नाईक, श्रेया गवंडे, राजू गवंडे, सुनील बांदेकर, राजेश पडते, मंगेश चव्हाण, किसन मांजरेकर, बबन शिंदे, अशोक सावंत आदी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
