Headlines

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत पर्यावरणपूरक सायकल व ई-बाईक रॅली उत्साहात….

वेंगुर्ला
“हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पर्यावरणपूरक सायकल व ई-बाईक रॅली आज बुधवारी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी वेंगुर्ला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक, शहरातील लोकप्रतिनिधी, विविध शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचा शुभारंभ वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथून करण्यात आला. त्यानंतर हॉस्पिटल नाका – दाभोली नाका – लकी स्टोअर्स – पॉवर हाऊस मार्गे रॅली पुन्हा वेंगुर्ला हायस्कूल येथे पोहोचली.
रॅलीमध्ये सायकलस्वार तसेच ई-बाईकधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’, ‘प्रदूषणमुक्त वाहतुकीचा स्वीकार करा’ अशा संदेशांद्वारे जनजागृती केली. तिरंगा ध्वजासह काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थितांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचा तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करण्याचा संदेश दिला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सायकलस्वार, ई-बाईकधारक तसेच सहभागी नागरिकांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page