⚡वेंगुर्ला ता.१३-: अल निनो वादळाच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू बागायतदार शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तळेकरवाडी महसूल गावातील शेतक-यांना तात्काळ मिळावी, अशी मागणी वायंगणी ( ता. वेंगुर्ला ) ग्रामपंचायत च्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत वायंगणी सरपंच व शेतकऱ्यांनी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
अल निनो वादळाच्या तडाख्यामुळे वायंगणी गावातील आंबा व काजू बागायतदार शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त शेतक-यांना महाराष्ट्र शासनामार्फत नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली असून, पात्र नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तालुका कृषी विभाग, महसूल विभागास तसेच जिल्हा परिषद विभागास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने संबंधित विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे करुन, ते सॉफ्ट कॉपी स्वरुपात २६ मे २०२६ रोजी तर हार्ड कॉपी ९ जुलै २०२६ रोजी तालुका कृषी विभागाकडे सादर करण्यात आले आहेत.
शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई वितरणाची प्रक्रिया पंचनाम्यांच्या आधारे करण्यात येते. वायंगणी ग्रामपंचायत हद्दीत वायंगणी व तळेकरवाडी असे दोन महसूल गावे आहेत. वायंगणी महसूल गावातील नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र तळेकरवाडी महसूल गावातील पात्र नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतक-यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत संबंधित विभागाकडे तोंडी विचारणा केली असता, शासनाकडून मागविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ढोबळ आकडेवारीचा कोटा पूर्ण झाल्यामुळे तळेकरवाडी येथील नुकसानग्रस्त शेतक-यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. ही बाब तळेकरवाडी येथील शेतक-यांवर अन्याय करणारी असून, एकाच ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त शेतक-यांमध्ये असा भेदभाव होणे योग्य नाही. पंचनामे झालेले असताना व शेतक-यांचे प्रत्यक्ष नुकसान झालेले असताना केवळ आकडेवारीचा कोटा पूर्ण झाल्याच्या कारणास्तव पात्र शेतक-यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवू नये. त्यामुळे तळेकरवाडी महसूल गावातील सर्व पात्र नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तात्काळ मिळावी. अन्यथा तळेकरवाडी येथील नुकसानग्रस्त शेतक-यांसह दि. १५ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला येथे शांततामय पध्दतीने उपोषण छेडण्यात येईल. सदर बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तळेकरवाडी महसूल गावातील नुकसानग्रस्त शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा व तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वेंगुर्ला वायंगणी तळेकरवाडी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी…
