⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-: पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळऊन दिल्याने त्याचे अभिनदंन केले.
जिल्हा परिषद शिक्षण समिती सभा सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा परिषद् छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब, समिती सदस्य विक्रांत सावंत, प्रमोद रावराणे ,नितीन राऊत, प्राची ईश्वलकर,यज्ञा साळगावकर, श्रावणी रावराणे, गुरुनाथ पेडणेकर आदींसह तालुक्याचे गटविकास अधिकारी उपस्थित होते या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता पाचवीच्या राष्ट्रीय ग्रामीण गटात कु. पियुष विजय लाड, कु. काव्या सदानंद तळेकर आणि कु. स्वरा पर्शुराम गुरव यांनी यश मिळविले. पाचवी ग्रामीण सर्वसाधारण गटात कु. आराध्य अमोल आपटे, कु. आराध्य दिनेश राणे आणि कु. ऊर्वी दत्तात्रय आठल्येकर यांनी गुणवत्तेची छाप पाडली.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय ग्रामीण गटात कु. दुर्वा निलेश धुरी, कु. वेद राजेंद्र जोशी आणि कु. गौरेश श्रेयस तायशेटे, तर आठवी ग्रामीण सर्वसाधारण गटात कु. कृतिका तेजस बांदिवडेकर, कु. आदित्य देविदास प्रभुगावकर आणि कु. दुर्वांक किशोर वालावलकर यांनी यश संपादन केले.
याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमार्फत घेण्यात येणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीमध्ये कु. शर्विल आनंद वरुते, कु. तन्वी तानाजी भोसले आणि कु. शांभवी उत्तम मोहिते, तर इयत्ता सातवीच्या प्रज्ञाशोध परीक्षेत कु. सोहम सुधीर गावडे, कु. श्रीनिवास बाबुराव मयेकर आणि कु. पूर्वा गजानन राणे यांनी यश मिळविले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि मार्गदर्शकांचेही अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि स्पर्धात्मक परीक्षांची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रेरणा मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापुर विभागात द्वितीय
सिंधुदुर्ग जिल्हा कोल्हापूर विभागात चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत द्वितीय क्रमांकावर राहिला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून सातारा, सांगली, रत्नागिरी हे जिल्हे अनुक्रमे तीन ते पाच क्रमांकावर आहेत.
प्रथम येण्याचा निर्धार
आजच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित शिक्षक तसेच मान्यवर सदस्य यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पुढील वर्षी पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मेहनत घेऊ .असा निर्धार केला.
