Headlines

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या…

सिंधुदुर्ग डोंगराळ जिल्हा असल्याने ६०:४०चा निकष लावण्याचा शिक्षण समितीचा ठराव; नव्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीलाही विरोध..

⚡ओरोस, ता. १२-: पवित्र पोर्टलद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत होणाऱ्या सुमारे २८० शिक्षकांच्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, यासाठी ६०:४० टक्के स्थानिक निकष लागू करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांचा विचार होणे आवश्यक असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. तसेच नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीद्वारे जिल्ह्याबाहेर जाता येऊ नये, यासाठीही शासनाकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण समितीची सभा झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब, सदस्य विक्रांत सावंत, गुरुनाथ पेडणेकर, नितीन राऊळ, प्राची इस्वलकर, यज्ञा साळगावकर, संतोष वारंग, अनंत फोंडके, प्रमोद रावराणे, अवनी तेली, अपर्णा सातोसकर, आदी उपस्थित होते.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षकांची सुमारे २८० पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये जिल्ह्यातील किमान ८० टक्के उमेदवारांना संधी मिळावी, अशी अपेक्षा सभेत व्यक्त करण्यात आली. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती होत असल्याने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यास मर्यादा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर सिंधुदुर्गची भौगोलिक परिस्थिती आणि डोंगराळ स्वरूप विचारात घेऊन शिक्षक भरतीसाठी ६०:४० टक्क्यांचा स्थानिक निकष लागू करण्याची मागणी शासनाकडे करण्याचा ठराव घेण्यात आला.
नव्याने नियुक्त होणारे शिक्षक काही काळ सेवा केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेल्यास पुन्हा शिक्षकांची पदे रिक्त होतात. त्यामुळे नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर जाता येऊ नये, यासाठीही ठराव घेण्यात आला

You cannot copy content of this page