Headlines

वेंगुर्ल्यात ‘संडेज ऑन सायकल’चा शंभरावा टप्पा उत्साहात…

नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते सायकल फेरीचा प्रारंभ..

⚡वेंगुर्ला ता.२९-: मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमाचा शंभरावा टप्पा वेंगुर्ल्यात आज उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, व्यायामाची आवड वाढविणे आणि सायकल चालविण्याच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल फेरीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य, व्यायाम आणि क्रीडा संस्कृतीचा संदेश दिला. उपक्रमाच्या शंभराव्या टप्प्यानिमित्त भारताच्या ऑलिम्पिक स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेशही देण्यात आला.
नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि सायकल चालविणे यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. युवकांनी मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्याऐवजी मैदानी खेळ, व्यायाम आणि अशा आरोग्यदायी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. ‘संडेज ऑन सायकल’सारखे उपक्रम निरोगी पिढी घडविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.
युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करणारे तुषार परब यांना ‘युवा आदर्श’, तर समाजमाध्यमांद्वारे प्रभावीपणे जनजागृती करणारे प्रभास घोगळे यांना ‘प्रभावक’ म्हणून नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले
कार्यक्रमाला माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, नगरसेवक प्रणव वायांगणकर, मुख्याध्यापक सचिन बिडकर, मेरा युवा भारतच्या अपेक्षा मांजरेकर, सुनील परब, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, सर्पमित्र महेश राऊळ, तुषार परब, प्रभास घोगळे, प्रज्वल परूळकर आणि किरण राऊळ, सुजल तुळसकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपेक्षा मांजरेकर यांनी केले. त्यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि शंभराव्या टप्प्याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.
सायकल चालविणे हा शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचा उत्तम मार्ग असून, त्यातून पर्यावरणपूरक जीवनशैलीलाही प्रोत्साहन मिळते. युवकांनी नियमित व्यायाम, मैदानी खेळ आणि सायकल चालविण्याला आपल्या जीवनात स्थान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
फोटोओळी – नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सायकल फेरीचा प्रारंभ केला.

You cannot copy content of this page