Headlines

सीमेवरील सैनिकरुपी भावांसाठी पाठविल्या २५हजार राख्या

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्शवत उपक्रम

मालवण (प्रतिनिधी)

एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी असा संदेश देत रक्षाबंधन सणानिमित्त मालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या तब्बल २५ हजार एवढ्या विक्रमी राख्या पोस्टाद्वारे भारताच्या सीमेवर विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिक रुपी भावांप्रति प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने भंडारी कॉलेजतर्फे हा उपक्रम सलग दहाव्या वर्षी राबविण्यात आला.

भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात सैनिकांना राखी पाठविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती माता, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमास मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सेवानिवृत्त सैनिक श्री. पी. टी. परब व श्री. विष्णू ताम्हाणेकर, मालवणचे पोस्ट मास्तर श्री. देसाई, डेप्युटी पोस्ट मास्तर श्री. पुलसुंगे, संस्थेचे कौन्सील ऑफ मॅनेजमेन्टचे सदस्य रामदास मयेकर, प्राचार्य आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्राध्यापक पवन बांदेकर, पालक सौ. दीपा नितीन राऊत, माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर, भूषण मेतर, भार्गव खराडे आदी व इतर शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्वात जास्त राख्या बनविणाऱ्या प्रथम – तनिष्का केळूसकर, द्वितीय- रुची कांबळी, तृतीय – लक्ष्मी दरगुडे या विद्यार्थिनींना पैठणी साडी व पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर शौर्या कांबळी, दिया गोलतकर, हर्षिता तारी या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी सैनिक हे देशाच्या सीमेवर खडतर परिस्थितीत क्लेशदायक व अनिश्चित असे जीवन जगत देशाचे संरक्षण करत असतात. अशा सैनिकांप्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना राखी पाठविण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांचा आदर्श घेत चांगले नागरिक बनून देशसेवा करण्याचा प्रयत्न करावा असेही ते म्हणाले. तर गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनी सैनिक हे सीमेवर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार असतात, सैनिकांना अशाप्रकारे आपल्या माणसांकडून राखीरुपी प्रेमाची भेट प्राप्त झाल्यावर त्यांना अंत्यत आनंद होतो, त्यामुळे भंडारी कॉलेजचा हा उपक्रमी स्तुत्य आहे असे सांगितले.

यावेळी माजी सौनिक पी. टी. परब यांनी विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोहचेपर्यंत राखीतील प्रेम व ताकद अधिक वाढलेली असेल, मालवणमधील आजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींमधून देखील उद्याचे सैनिक घडले पाहिजेत,असे सांगितले. तर श्री. ताम्हाणेकर यांनी आजचे युवा हे देशाचे पुढील आधारस्तंभ आहेत, आपल्या छोट्या छोट्या कृतीतून देशसेवा करत राहावी असे सांगितले. यावेळी आर. डी. बनसोडे, रामदास मयेकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता परब – पवार यांनी केले तर आभार श्री. गोसावी यांनी मानले.

You cannot copy content of this page