Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा

विजेत्यांना ५० हजारांपर्यंत बक्षीस

कुडाळ : जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दूध सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संस्थेला ५० हजार, द्वितीय क्रमांकाला ३० हजार, तर तृतीय क्रमांकाला २० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सन २०१२ पासून गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन सुरू झाले. त्यावेळी सुमारे ५०० लिटर प्रतिदिन असलेले दूध संकलन आता २८ हजार लिटर प्रतिदिनपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील १२१ गावांमधील १४१ दूध सहकारी संस्थांच्या माध्यमातून दूध संकलन केले जात आहे.
पुढील पाच वर्षांत जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट बँकेने निश्चित केले असून, त्या दिशेने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
दूध सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनातील वाढ, सभासदांना देण्यात येणारी सेवा तसेच बँक व शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमुळे दूध सहकारी संस्थांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा गौरव होईल. तसेच इतर संस्थांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि दूध उत्पादक सभासदांना बँकिंग सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यास मदत होईल, असे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके तसेच प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५० हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार आणि तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपयांचे बक्षीस असेल. ही तीनही बक्षिसे सलग तीन वर्षे देण्यात येणार असून, संस्थेच्या गरजेनुसार वस्तू किंवा साहित्य स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दूध सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील आवश्यक माहिती २० ऑगस्ट २०२६ पर्यंत बँकेकडे सादर करावी, असे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page