Headlines

वैभववाडी एसटीच्या दुरवस्थेवर रावराणे आक्रमक..

१८ ऑगस्टला विभागीय नियंत्रकांची पाहणी..

वैभववाडी(प्रतिनिधी )
वैभववाडी तालुक्यातील एस.टी. बसस्थानकाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्री. घोडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत श्री. रावराणे यांनी आज भेट घेतली व समस्यांचे सविस्तर निवेदन दिले
या निवेदनाची आणि एसटीच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत, विभागीय नियंत्रक श्री. घोडे यांनी मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे मान्य केले आहे.

अपुऱ्या सुविधा आणि रखडलेले बांधकाम

जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी दिलेल्या निवेदनात बसस्थानकातील अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. वैभववाडी बसस्थानकाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच बसस्थानकावर दोन कंट्रोलर पदे तातडीने मंजूर करावीत, प्रवाशांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांचे बांधकाम त्वरित करावे, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी आणि स्थानक परिसरात स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियुक्ती करावी, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी

वैभववाडी तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी ‘मानव विकास’ योजनेअंतर्गत सात गाड्या मंजूर आहेत. मात्र, या गाड्यांचा वापर इतर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या सातही गाड्या केवळ विद्यार्थ्यांसाठी नियमित वापरल्या जाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांचे एसटी पास त्यांच्या शाळेतच जाऊन काढून देण्याची सोय करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल.
रात्री वस्तीला जाणाऱ्या जांभवडे, उपळे, दिगशी, भुईबावडा, कुर्ली यांसारख्या अनेक गाड्या बसस्थानकातून वेळेवर सोडल्या जात नाहीत किंवा अचानक रद्द केल्या जातात. काही गाड्यांमधून विद्यार्थी व प्रवाशांना अर्धवट प्रवासातच खाली उतरवले जाते. याशिवाय अनेक वाहक आणि चालकांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी असून, तक्रारवहीत तशा नोंदीही आहेत. या सर्व प्रकारांची प्रत्यक्ष शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची आग्रही मागणी श्री. रावराणे यांनी केली आहे. तसेच वाहक आणि चालकांना दुबार ड्युटी लावू नये, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कोरोना काळापासून बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी

कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या अनेक एसटी गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. यामध्ये खालील फेऱ्यांचा समावेश आहे:

  • कणकवली-फोंडा-वैभववाडी-भुईबावडा मार्गे पाचल
  • कुरुंदवाड-पणजी
  • वैभववाडी-परळ
  • कुर्ली-सडुरे मार्गे वैभववाडी
  • खारेपाटण-भुईबावडा-कोल्हापूर
  • गगनबावडा-भुईबावडा-पाचल मार्गे बोरीवली
  • वैभववाडी-नायदे-कातकरवाडी-दिगशी मार्गे तिथवली
    या व्यतिरिक्त खारेपाटण-भुईबावडा मार्गे कुरुंदवाड आणि अक्कलकोट या दोन नव्या गाड्या सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

स्थानक परिसरात खाजगी वाहनांना बंदी घाला

वैभववाडी बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी स्थानक परिसरात खाजगी वाहनांना बंदी करावी आणि बसस्थानकातील आरक्षण व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांनाही पाठविण्यात आली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी विभागीय नियंत्रक वैभववाडी बसस्थानकाची पाहणी करणार असल्याने, प्रशासनाकडून या समस्यांवर नेमकी काय कार्यवाही होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page