Headlines

पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच नाही..

जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांची समिती स्थापनेची मागणी:अन्यथा स्वातंत्र्यदिनी उपोषणावर ठाम..

⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यातील पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप जनकल्याण समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याने ती तातडीने स्थापन करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा मतदारसंघ पिंगुळीचे सदस्य गंगाराम गणेश सडवेलकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. समिती स्थापन न केल्यास येत्या १५ ऑगस्टला उपोषणास बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीच्या स्थापनेसंदर्भात यापूर्वीही वारंवार सूचना देण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने २८ जून २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही जनकल्याण समिती स्थापन करण्याबाबत कार्यवाही झालेली नसल्याचे सडवेलकर यांनी निदर्शनास आणून दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत जनकल्याण समिती स्थापन करून त्याची माहिती कळवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा या संदर्भात पुढील पत्रव्यवहार केला जाणार नाही, थेट उपोषण असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पत्राच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कुडाळ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर तसेच कुडाळ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page