Headlines

बॅ नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती

अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांना संदेश

कुडाळ : पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाणे आणि साईज फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवन येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अमली पदार्थमुक्ती, डायल 112 राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाइन, महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर यांनी सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी प्रवृत्त करणारा व्यक्ती खरा मित्र होऊ शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींपासून वेळीच दूर राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यात फसवणूक झाल्यास किंवा ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकाराला सामोरे जावे लागल्यास घाबरून न जाता आई-वडील, शिक्षक किंवा विश्वासू मित्रांशी चर्चा करावी. कोणतीही समस्या लपविण्यापेक्षा वेळीच मदत घेणे महत्त्वाचे असून, आपली सजगताच आपले संरक्षण करू शकते, असे काळसेकर यांनी स्पष्ट केले.
अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यास ती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही करण्यात आले. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल तसेच पोलीस दल विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि समाजाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी योगदान देण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.
यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश गायतोंडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर देवाडेकर, साईज फिल्म्सचे लाईन प्रोड्यूसर साईनाथ जळवी, अभिनेत्री रुचिता शिर्के, टीम मेंबर दिनार पावस्कर, ड्रोन ऑपरेटर अक्षय मळेकर आदी उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अरुण मर्गज, प्राचार्य चैताली बांदेकर, उपप्राचार्य चित्रा कुंटे, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page