Headlines

सावंतवाडीतील तीन गाळे पालिकेकडून ‘सील’..

श्रेयश मुंज यांच्या तक्रारीची दखल:अनधिकृत व्यक्तींकडून गाळे वापरल्याचा ठपका

⚡सावंतवाडी ता १२-: लाभधारकांच्या ऐवजी अन्य व्यक्ती गाळे वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सावंतवाडी पालिका प्रशासनाने इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील तीन गाळे सील केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पालिकेचे कर विभागाचे अधिकारी गोविंद गावडे यांनी सांगितले की, संबंधित गाळे ज्या लाभधारकांच्या नावावर मंजूर आहेत, त्यांच्याऐवजी अन्य व्यक्ती गाळ्यांचा वापर करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. संबंधितांना गाळे २४ तासांत खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने गाळे सील करण्यात आले आहेत.
दरम्यान, गाळ्यांमध्ये संबंधितांच्या जीवनावश्यक वस्तू असल्याने पुढील निर्णय मुख्याधिकारी घेणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या कारवाईबाबत श्रेयश मुंज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असली तरी संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चुकीच्या पद्धतीने गाळ्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पालिका प्रशासनाने केलेली कारवाई आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, या प्रकरणी पुढील लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मुंज यांनी घेतली आहे.

You cannot copy content of this page