महसूल विभागाची जेसीबीच्या साहाय्याने धडक कारवाई:सहा गावांमध्ये विशेष मोहीम..

⚡कुडाळ ता.२९-: कर्ली नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने रविवारी धडक कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत चेंदवण, कवठी, वालावल, नेरूरपार, नाईकनगर आणि सोनवडे परिसरातील अनधिकृत वाळू वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले एकूण ३३ रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये चेंदवण येथील ४, वालावलमधील ७, सोनवडे येथील ९ आणि नेरूरपार येथील १३ रॅम्पचा समावेश आहे.
कर्ली नदीतील वाळू गटांच्या लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नदीपात्रातील वाळू उत्खननास बंदी आहे. तरीही काही ठिकाणी बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कारवाई केली. अवैध वाळू उत्खनन, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
