Headlines

साहित्यातील योगदानाच्या गौरवाने साहित्यिक भारावले

सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात १९ साहित्यिकांचा सन्मान

मालवण (प्रतिनिधी)

स्थानिक साहित्यिकांच्या कार्याची समाजासमोर ओळख करून देण्याच्या उद्देशाने मालवणात बॅ. नाथ सेवांगण येथे रंगलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात मालवण परिसरातील साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १९ साहित्यिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या साहित्यिकांच्या आजावरच्या कार्याचा आढावा घेत केलेल्या गौरवाने साहित्यिक भारावून गेले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी मालवण परिसरातील ज्येष्ठ आणि विविधी क्षेत्रातून साहित्यिक योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, जगदीश नलावडे, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, रवींद्र वराडकर, डॉ. विवेक रेडकर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र खंडाळेकर, नंदकिशोर महाजन, पद्मनाभ शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साप्ताहिक ‘जनयुग’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र खांडाळेकर, साप्ताहिक आघाडीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, मालवणी व मराठीत विपुल साहित्य लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले एम.डी. डॉक्टर आणि आरोग्य विषयक लेखन करणारे डॉ. विवेक रेडकर, ज्येष्ठ साहित्यिक, सेवानिवृत्त शिक्षक आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेचे तालुकाध्यक्ष रवींद्र वराडकर, ज्येष्ठ साहित्यिका व ऐलमा पैलमा अक्षरदेवा’ या उपक्रमाच्या संस्थापक वैशाली पंडित, कवयित्री आणि निवृत्त शिक्षिका संध्या शिवराम तांबे, मालवणी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये साहित्यनिर्मिती करणारे रुजारिओ पास्कॉल पिंटो, सेवानिवृत्त शिक्षक, लेखक व नाट्य समीक्षक विनायक प्रल्हाद कोळंबकर, सेवानिवृत्त शिक्षिका, समुपदेशक आणि बालसाहित्य लेखिका मेघना संजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार, ग्रंथपाल, नाट्य दिग्दर्शक व एकांकिका लेखक व दैनिक रत्नागिरी टाइम्सचे मालवण प्रतिनिधी प्रफुल्ल वसंत देसाई, कवी, गीतकार, संगीतकार, गायक आणि शीघ्रकवी मंदार श्रीकांत सांबारी, कवी, कथालेखक, शिक्षक आणि कातळशिल्प अभ्यासक कमलेश विनायक गोसावी, कवयित्री आणि लेखिका शुभदा (तनुश्री) राजेश पेडणेकर, लेखक आणि कांदळगाव या गावाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचे दस्तऐवजीकरण करणारे उमेश दिनकर कोदे, पत्रकार, संपादक आणि लेखक सुयोग श्रीनिवास पंडित, मालवणी नाट्यलेखक व नाटककार संदीप दत्ताराम चिपकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षण, साहित्य आणि बालनाट्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणारे कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण आणि साने गुरुजी कथामाला, मालवणचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांचा सन्मान मंदार सांबारी यांनी स्वीकारला तर दूरचित्रवाणी पत्रकार आणि वृत्तनिवेदक तसेच एकांकिका लेखक, नाट्य कलाकार तसेच विविध विषयांवर लेखन करणारे ऋषी श्रीकांत देसाई यांचा सन्मान त्यांच्या मातोश्री सेवानिवृत्त शिक्षिका विजयश्री देसाई यांनी स्वीकारला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या साहित्यिक वाटचालीचा मागोवा घेत मालवण मधील जुन्या साहित्यिक आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी मालवणी कवितेचे सादरीकरण केले. तसेच डॉ. विवेक रेडकर यांनीही मनोगत व्यक्त करत आरोग्याबाबत आणि विविध आजाराबाबत लोकांमध्ये प्रबोधन व जागृती निर्मम करण्यासाठी आपण आरोग्य आणि वैद्यकीय विषयक लिखाण केले असे सांगत वैद्यकीय साहित्य व मेडिकल जर्नालिझम वाढीस लागले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यिक, साहित्य प्रेमी, युवा साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.

आदर्श वाचकांचा गौरव

वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मालवणमधील तीन वाचनालयांच्या माध्यमातून आदर्श बाल वाचक आणि आदर्श मोठा वाचक यांची निवड करण्यात आली होती. या वाचकांचा या संमेलनात विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवाजी वाचन मंदिरचे वाचक हिमांशू संतोष मालवणकर व अनंत महादेव अंधारी, नगर वाचन मंदिरचे वाचक प्रफुल्ल कमलाकर गवंडे, अस्मि अशोक आठल्येकर, बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरचे वाचक सोहम धामापूरकर, चंद्रप्रकाश पिंगुळकर या वाचकांचा सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page