⚡सावंतवाडी ता.१२-: शहराला पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज पहाटे ३.४५ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे सर्व सहाच्या सहा हायड्रोलिक दरवाजे ओव्हरफ्लो झाले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
यंदा पावसाचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्यामुळे धरणाची पाणीपातळी सुमारे एक मीटरने खाली होती. त्यामुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार आणि सततच्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात वेगाने वाढ झाली आणि अखेर धरण पूर्ण भरले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी धरण ओव्हरफ्लो झाल्याची आनंदाची माहिती देत सावंतवाडीकरांना ही खूशखबर दिली आहे. पाळणेकोंड धरण पूर्ण भरल्यामुळे आता सावंतवाडी शहराचा येत्या काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
