विकास संस्थांच्या निवडणुकीत राजकारण तापले;एसटी संपामुळे बाजारपेठांमध्ये मंदी
*⚡कणकवली ता.१९-:* फळांचा राजा हापूस आंबा हा सद्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात अधुनमधून पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वारा वाहत असतो. त्यातच ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली आहे. त्याच्या एकत्रित परिणामामुळे अपरिपक्व हापूस आंब्यासह काढणीला आलेले आंबेही जमिनदोस्त झाले आहे. झाडांवर शिल्लक असलेल्या आंब्यांवर पाऊसाचे पाणी मुरल्यामुळे आता हा आंबा खाण्यायोग्य राहिलेला नाही. त्यामुळे हापूस उत्पादक बागायतदार शेतकऱ्याना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. सद्या हापूस आंब्याचा डझनाचा दर रुपये ८००/- ते १२००/- एवढा आहे. तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. एप्रिल-मे महिन्यात दर उतरतात, अशी आंबे खवय्यांची अटकळ असते. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता यंदा आंब्याचे दर उतरण्याऐवजी ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलत्या वातावरणामुळे हापूस सह रायवळ आंबे, काजू, कोकम, जांभूळ आदी मौसमी पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी-बागायतदार यांच्यावर कोरोना महामारीच्या पाठोपाठ या मानव निर्मित नैसर्गिक संकटामुळे आभाळ कोसळले आहे. मात्र दुर्दैवाने सिंधुदूर्गसह कोकणातील कोणत्याही पक्षांच्या लोकप्रतिनिधी, नेत्यांना काहीच सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत कोणीही ब्र काढताना दिसत नाही. याउलट परिस्थिती राज्यातील अन्य भागातील आहे. तेथील लोकप्रतिनिधी अशा प्रसंगी पक्षभेद विसरून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. मात्र सद्या हीच राजकारणी मंडळी गावागावांतील, पंचक्रोशीतील छोट्या छोट्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत व्यग्र असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. मात्र शेतकर्यांच्या सुख दु:खाचे त्यांना वावडे असल्याचे दिसत आहे. सद्या सिंधुदुर्ग जिल्हात अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मुंबई कोकण गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांचे वेग वाढले आहेत. त्यामुळे महामार्गावरील अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तरुणांच्या बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या अट्टाहासापोटी अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. घरातील करता सवरता एकुलता एक असलेले तरुण अशा अपघातात बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उध्वस्त होत आहेत. अपघातापेक्षा भयावह परिस्थिती तरुणांच्या आत्महत्यांनी निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शहरांच्या ठिकाणी असलेल्या नोकर्या गमवाव्या लागल्यात. गावी आल्यावर उदरनिर्वाहासाठी तो पडेल ती कामे करु लागला. बागायतींचे नुकसान झाले. कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. त्याला नैराश्याने गाठले. परिणामी तो आत्महत्येचा मार्ग चोखाळू लागला. दैनिकांतील आत्महत्येच्या बातम्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. घरातील कर्ता सवरता तरुण आत्महत्येमुळे जाण्यामुळे त्या कुटुंबावर किती आघात होतील, याची कल्पना केल्यावर समाजातील प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल.
सुदैवाने या आत्महत्यामध्ये तरुणींची संख्या नगण्य आहे. आता मानसोपचार तज्ज्ञांनी या आत्महत्येमागच्या कारणमीमांसाचा शोध घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशा आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. एस. टी. च्या साडेपाच महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या संपाची झळ खेड्यापाड्यांतील जनतेला भोगावी लागली आहे. विद्यार्थांना परिक्षाच्या दरम्यान खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने आर्थिक झळ बसली आहे. तर बाजारपेठांमध्ये ग्राहकच कमी झाल्याने व्यापार उद्दीमावर मंदी ओढावली आहे. व्यवसाय निम्म्यावर घसरले आहेत. त्याचाही आर्थिक फटका व्यापारांना बसला आहे. विशेषतः बस स्थानकांतील व्यावसायिक आगीतून फोपाट्यात पडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा घडामोडींमुळे विकासाचा गाड्याला नक्कीच खिळ बसत आहे. नैसर्गिक आपत्ती रोखता येणे शक्य नाही. मात्र नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकारणा विरहित पुढाकार घेण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी चालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. आत्महत्या रोखण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगधंदे उभे करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.अशी प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
