अपप्रकार रोखण्यासाठी शाळेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची अनुमती देऊ नका…

हिंदू जनजागृती समितीची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी…

सिंधुदुर्गनगरी ता.०५-:* १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयात ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ साजरा करण्यास अनुमती देऊ नये.तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना द्यावेत. अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे . पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे . ‘ व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . तसेच , यादिवशी होणाऱ्या पार्ट्यामधून युवक-युवती यांच्यात मद्यपान , धूम्रपान , अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे . तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात . काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘ लव्ह जिहाद’चा बळी बनवतात .

‘ व्हॅलेंटाईन डे’ मुळे शाळा महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा – सुव्यवस्था , तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे . यामुळे होणाऱ्या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरही येत आहे . सद्यस्थितीत भारतात महिलांवरील अत्याचारांची आकडेवारी वाढली आहे. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची नितांत आवश्यकता आहे . या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटना या ‘ डे संस्कृती’ला विरोध करत भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत . एकीकडे विदेशांत भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेत त्यानुसार आचरण करणाऱ्यांमध्ये वाढ होत असतांना , भारतीय युवापिढीला जाणीवपूर्वक पाश्चात्यांच्या कुप्रथांमध्ये गुरफटून टाकण्याचे षड्यंत्रही मोठ्या प्रमाणात चालू आहे . भारतीय समाजव्यवस्था उत्तम रहावी आणि अनैतिक कृत्यांमुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा , यासाठी युवापिढीचे प्रबोधन करण्याचीही नितांत आवश्यकता आहे . त्यामुळे व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणाऱ्या अपप्रकारांचे प्रमाण पाहता महाविद्यालयांत ‘ व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम , तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना द्यावेत. कोणत्याही महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे ‘ साजरा करण्यास अनुमती देऊ नये , शाळा – महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी कोणतेही गैरप्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल , अशा सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना हिंदू जनजागृती चे विजय मिसाळ, पुंडलिक गवस, रवींद्र परब, मेघा परब उपस्थित होते.

You cannot copy content of this page