सिंधुदुर्गच्या आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासह विविध आरोग्यविषयक विषयांवर सविस्तर चर्चा!
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी शुक्रवारी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या.
या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, आरोग्य व्यवस्थेतील आवश्यक सुधारणा, वैद्यकीय सुविधा बळकट करणे तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आणि प्रशासन समन्वयाने कार्यरत असून, आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
