Headlines

निवडणूक जातपडताळणीसाठी भरलेली फी पात्र उमेदवारांना परत द्या

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणीसाठी उमेदवारांकडून ५०० रुपयांची फी जमा करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे अनेक उमेदवारांना या प्रक्रियेचा लाभ मिळाला नसल्याने त्यांच्याकडून जमा करण्यात आलेली फी परत करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग जात पडताळणी समितीकडे केली आहे.

याबाबत त्यांनी समितीकडे निवेदन सादर केले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून जात पडताळणीसाठी ५०० रुपयांची फी स्वीकारण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. काहींची उमेदवारी इतर कारणांमुळे रद्द झाली, तर काहींना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अर्ज मागे घेतले.

अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांनी भरलेली फी शासनाकडे जमा राहिली असून ती अद्याप त्यांना परत मिळालेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा सर्व पात्र उमेदवारांची यादी तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि त्यांनी भरलेली रक्कम त्यांना परत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी उपरकर यांनी केली आहे.

या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत विविध कारणांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या उमेदवारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page