मालवण (प्रतिनिधी)
मालवण- आचरा मुख्य रस्त्यावर ओझर येथे आज सायंकाळी बुलेट व रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (वय ३१, रा. कांदळगाव) व रिक्षा चालक महेश अनिल घाडी (वय ३८, आचरा पारवाडी) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दोघांनाही तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण – आचरा मुख्य रस्त्यावर आज रविवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास आचरा पारवाडी येथील रिक्षाचालक महेश अनिल घाडी हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०७ एफ २३४१) घेऊन मालवणहुन आचऱ्याच्या दिशेने जात होते. याच वेळी कांदळगाव येथील राज कोदे हा तरुण बुलेटवरून कांदळगाव येथून ओझरच्या दिशेने येत असताना ओझर येथील पेट्रोलपंपच्या पुढील आचऱ्याच्या दिशेकडील रस्त्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बुलेटस्वार राज कोदे हा रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्यास जबर दुखापत झाली. तर रिक्षाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान होऊन रिक्षा चालक महेश घाडी हे देखील गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यावर स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक श्री. भोसले, पोलीस जनार्दन रेवंडकर, जितेंद्र पेडणेकर यांनी घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आल्यावर दोघांनाही अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
