निवड चाचणी स्पर्धेत होणार पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर
कुडाळ : इटली येथे होणाऱ्या ९व्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडण्यासाठी २७ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील हरकिशन सिंग सुरजीत भवन येथे राष्ट्रीय मानांकन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीसाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने पुरुष व महिला अशा दोन्ही गटांतील संघ जाहीर केला आहे.
खेळाडूंच्या गेल्या १२ महिन्यांतील कामगिरीचा विचार करून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला आहे. हा संघ २६ सप्टेंबर रोजी विमानाने दिल्लीला रवाना होणार आहे. निवड चाचणीपूर्व तयारीसाठी २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान एमसीए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या निवड चाचणी स्पर्धेत पोटॅटो स्टार्च पावडरचा वापर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडू प्रथमच या पावडरवर खेळणार असल्याने त्यांच्या सरावासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने पावडरची व्यवस्था केली आहे. या प्रशिक्षण शिबिरात वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कॅरमपटू तथा राष्ट्रीय प्रशिक्षक अरुण केदार खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने संघातील खेळाडूंना संपूर्ण प्रवास खर्च, प्रवास भत्ता तसेच गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या पुरुष संघामध्ये सागर वाघमारे (पुणे), संजय मांडे (ठाणे), सिद्धांत वाडवलकर (मुंबई), विकास धारिया (मुंबई) यांचा तर महिला संघात आकांक्षा कदम (रत्नागिरी), सोनाली कुमारी (मुंबई), रिंकी कुमारी (मुंबई) आणि चैताली सुवारे (ठाणे) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय मानांकन निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारे इटली येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी भारताच्या संघाची निवड होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी ही निवड चाचणी महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी दिली आहे.
