पं. स. सदस्या अर्चना बंगे यांची मागणी:ग्रामस्थांनी यापूर्वीही केली श्रमदानातून रस्ता दुरुस्ती..
⚡कुडाळ ता.२०-: वालावल गावधडवाडी ते बांधकोंड हुमरमळा तसेच वालावल साई हनुमान मंदिर ते कोडबसवाडी–समर्थनगर हुमरमळा हे दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करून त्यांचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
याबाबत अर्चना बंगे यांनी सांगितले की, वालावल आरकाचे पूल–गावधडवाडी–करमळी–बिजोळेवाडी–बांधकोंड–हुमरमळा तसेच वालावल साई हनुमान मंदिर–सुतारवाडी–कोडबसवाडी–समर्थनगर–हुमरमळा हे दोन्ही मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. वालावल–धारवळ–बांधकोंड या मार्गावर यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहतूक जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे, वालावल साई हनुमान मंदिर ते कोडबसवाडी श्री धोंगडेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता काही प्रमाणात वाहतुकीस योग्य असला, तरी कोडबसवाडी ते समर्थनगर–हुमरमळा हा मार्ग जोडणे आवश्यक आहे. या मार्गासाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला असून, काही ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आपल्या जमिनीही उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अनेक वेळा स्वतःच्या खर्चाने श्रमदान करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
दोन्ही रस्त्यांचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाल्यास वालावल आणि हुमरमळा परिसरातील गावांना थेट दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होऊन या भागातील वाहतुकीला चालना मिळेल, असे अर्चना बंगे यांनी सांगितले.
दोन्ही रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांचा योजनेत अग्रक्रमाने समावेश करून कामे मंजूर करावीत, अशी विनंती अर्चना बंगे यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
