Headlines

कळसुली गणेश घाटाकडे जाणारा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी सरपंच सचिन पारधीये यांचा पुढाकार

कणकवली : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र ते गणेश घाट,गवसेवाडी हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटाकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच विसर्जनाच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी श्री. नायटीये सांस्कृतिक मंडळ गवसेवाडी तसेच श्री. देवी नायटीये प्रासादिक भजन मंडळ व विविध सांस्कृतिक कार्यकारी मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या माध्यमातून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना रस्त्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सरपंच सचिन पारधीये यांच्या माध्यमातून गेली पाच वर्षे स्वखर्चातून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले जात असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, केवळ रस्त्याची डागडुजीच नव्हे तर गणेश घाट परिसरातील वाढलेले गवत आणि झाडीही ग्रास कटरच्या साहाय्याने काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना, विशेषतः लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच विसर्जनाच्या वेळी परिसरात सुरक्षितपणे वावरता यावा, या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
“गणेश घाटाकडे जाणारा रस्ता विसर्जनाच्या गाड्यांसाठी व्यवस्थित असावा आणि गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,” असे मंडळाचे अध्यक्ष वैभव पारधीये यांनी सांगितले.

यावेळी खजिनदार दिलीप सावंत यांनीही मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, गणेशोत्सव काळात गणेश घाट परिसरात मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासोबतच घाट परिसरातील झाडी-गवत काढण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात प्रशासनाकडून होणाऱ्या कामांसोबतच स्थानिक मंडळांनीही पुढाकार घेतल्याने परिसरातील नागरिक आणि गणेश भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. गणेश विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे.

यावेळी सरपंच सचिन पारधीये,श्री.नायटीये देवी सांस्कृतिक मंडळाचे वैभव पारधीये ,खजिनदार दिलीप सावंत, , शंकर पारधीये, किशोर चव्हाण, महेश पारधीये, पुंडलिक चव्हाण, तन्मय ठाकूर, सुशील पारधीये, महेश चव्हाण, श्याम आर्डेकर, सिद्धेश पारधीये, समीर पारधीये, रुपेश ताम्हाणेकर, सिताराम सावंत, भालचंद्र सावंत, दिगंबर पारधीये आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page