कणकवली : “राज्यात महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रशासन, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने कायम ठेवावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद ठेवून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. दुर्गम व डोंगराळ भागात ऑनलाइन सुविधांमध्ये अडचणी असल्यास आवश्यकतेनुसार ऑफलाइन सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात. शासनातील मंत्री म्हणून मी तसा निर्णय करेन. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी नेहमी चांगले काम करतात आणि त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रशासनाकडून अशाच कार्यपद्धतीची अपेक्षा आहे. त्यामुळे केवळ महाराजस्व अभियानातच नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस नागरिकांना सेवा द्या. मी पालकमंत्री असेपर्यंत कोणत्याही चुकीच्या कामाला अजिबात पाठीशी घालणार नाही,” असा स्पष्ट इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
जानवली येथील राधेश्याम हॉल येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्र्यांनी विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉल्सची, आरोग्य तपासणी शिबिराची तसेच रक्तदान शिबिराची पाहणी केली. विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते लाभपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सभापती हर्षदा वाळके, गणेश राणे, समाजकल्याण सभापती रुहीता तांबे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, सावी लोके, नगरसेवक राकेश राणे, देवगड तहसीलदार शीतल जाधव, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारातून प्रेरणा घेऊन राज्य शासनाने राबविलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ हे नागरिकांना शासनाच्या विविध योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविले जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले आणि प्रमाणपत्रे दिली जात आहेत. आता लाभपत्रे स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे शासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.
प्रशासनाने वर्षभर लोकाभिमुख, पारदर्शक आणि संवेदनशील पद्धतीने काम करून नागरिकांच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवाव्यात. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले आहेत. शासनाला अशक्य असे काहीच नसते. इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर प्रत्येक प्रश्नाचे समाधान होऊ शकते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या सर्व योजनांचा सखोल अभ्यास करून त्या प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात. लाभार्थी निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी. दुर्गम भागात ऑनलाइन सेवांमध्ये अडचणी असल्यास नागरिकांना लाभापासून वंचित ठेवू नये आणि आवश्यकतेनुसार ऑफलाइन प्रक्रियेलाही प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल विभाग तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रास्ताविकात प्रांताधिकारी जगदीश कातकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या ‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले, मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल, कृषी, ग्रामीण विकास, वन, मत्स्यव्यवसाय, पंचायत राज, महिला व बालविकास, आरोग्य, समाजकल्याण, सहकार, मुद्रांक व नोंदणी, भूमी अभिलेख, पोलीस विभाग आदी विविध विभागांचा सहभाग असून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. महसूल विभागामार्फत विविध प्रकारचे दाखले, गावठाण स्वामित्व सनद, महिला शेतकरी प्रमाणपत्र, निवासी अतिक्रमण नियमितीकरण आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विविध विभागांचे माहिती स्टॉल आणि डिजिटल महसूल सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. महसूल विभाग हा या अभियानाचा समन्वयक विभाग असून सर्वच विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जात आहे. मंडळनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरांमुळे शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर म्हणाले, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचारातून शासनाचे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानातून विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचवल्या गेल्या. पोलीस विभागाकडे देण्यासारखे काही नाही. मात्र, ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केल्यास आपत्कालीन प्रसंगी पोलीस अवघ्या ९ ते १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. तसेच अनेक लाभार्थ्यांना विविध योजनांचे धनादेश आणि लाभपत्रांचे वितरण करण्यात आले.
