Headlines

फोंडाघाटमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त; एकावर गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यांतर्गत फोंडाघाट दुर्गक्षेत्रात राबविण्यात आलेल्या ‘ऑलआऊट ऑपरेशन’ दरम्यान पोलिसांनी गोवा बनावटीची दारू बेकायदा बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करत ८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विनोद दिगंबर पवार (वय ५४, रा. फोंडा बाजारपेठ, ता. कणकवली) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मधुकर जाधव यांना गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फोंडा बाजारपेठेतील मच्छीमार्केट रोडलगत, मिनल कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागे विनोद पवार हा गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यात विनोद पवार याच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीची पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या एकूण ८८ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यात BOBs Lemon Vodka या ब्रँडच्या १८० मिलीच्या ७२ बाटल्या (किंमत ७,२०० रुपये) तसेच Honey Blend Pure Brandy या ब्रँडच्या १८० मिलीच्या १६ बाटल्या (किंमत १,६०० रुपये) असा एकूण ८,८०० रुपयांचा मुद्देमाल होता.

चौकशीदरम्यान आरोपीकडे दारू विक्री अथवा साठवणुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पंचांसमक्ष नमुना बाटल्या सीलबंद करून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल जाधव यांच्या फिर्यादीवरून विनोद दिगंबर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.

You cannot copy content of this page