३० जूनपासून बीएलओ घरोघरी करणार सर्वेक्षण: नागरिकांनी सहकार्य करावे; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन..
⚡ओरोस ता २५-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदारांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून ३० जून पासून प्रत्यक्ष बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचा फॉर्म भरून घेणार आहेत. यापूर्वी हा कार्यक्रम २००२ मध्ये झाला होता. २४ वर्षांनी पुन्हा राबविल्या जाणाऱ्या विशेष पुनरीक्षण मोहीमेला जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम बाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी बैठक सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या सोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते. या मोहिमेच्या अनुषंगाने २००२ मधील मतदार आणि सध्याचे मतदार यांचे मॅपिंग करण्यात आले आहे. यामध्ये ९२.४२ टक्के काम झाले असून यामध्ये जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक राहिला असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना धोडमिसे यांनी, १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षण, छपाई ही पूर्वतयारी २० जून पासून सुरू झाली असून २९ जून पर्यंत हा कालावधी राहणार आहे. तर मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन फॉर्म भरण्याचे काम ३० जून पासून सुरू होणार आहे. २९ जुलै पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरून घेणार आहेत. यावेळी पात्र मतदारांना यादीत घेतले जाणार असून अपात्र मतदारांना वगळले जाणार आहे. तसेच दुबार मतदार आणि मयत मतदार यांना वगळले जाणार आहे. मयत मतदारांचा मृत्यू दाखला घेऊन किंवा मृत्यू दाखला नसल्यास स्थानिक पंचनामा करून नाव कमी केले जाणार आहे. फॉर्मवर मतदाराची स्वाक्षरी घेऊन एक फॉर्म मतदाराला दिला जाणार असून दुसरा अर्ज बीएलओ सोबत घेणार आहेत.
५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा अन्य तक्रारी असल्यास हरकत घेता येणार आहे. या हरकती बीएलओ किंवा त्यांच्या सहाय्यक असलेल्या व्यक्तींकडे नोंदविता येणार आहे. ३ ऑक्टोबर पर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या हरकती निकाली काढल्या जाणार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.
