⚡मालवण ता.२५-: मालवण-दांडी श्रीकृष्णवाडी समुद्रकिनारी भूषण धुरी व त्यांचे खलाशी यांना समुद्राच्या लाटांमधून ‘मास्कड बुबी’ हा दुर्मिळ समुद्री पक्षी किनाऱ्याकडे वाहत आल्याचे निदर्शनास आले. तो पक्षी उडू शकत नसल्याने गणेश तारी यांनी लगेच युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला. संस्थेने याची माहिती कांदळवन विभागास दिली असता त्याठिकाणी कांदळवन विभागाचे रुपेश कांदळगावकर व कर्मचारी तातडीने पोहचल्यावर स्थानिकांनी पक्षी सुखरूपपणे कांदळवन विभागाकडे सुपूर्द केला.
यावेळी दांडी गाव अध्यक्ष संजिव धुरी, प्रज्योत धुरी, एकनाथ केळुसकर, वसंत(जीजी) धुरी, काशिराम(नाना) तारी व इतर उपस्थित होते. तो पक्षी दमलेला असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास सागरी वन्यजीव उपचार केंद्रात हलवले. कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्रा मार्फत रीफ वॉच मरीन काँझर्वेशन चे पशुवैद्य श्री.मनोहर नगरे हे त्या पक्षावर उपचार करत असून पक्षी सुखरूप आहे, अशी माहिती उपचार केंद्रातून देण्यात आली.
