नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले यांची एकमताने निवड:जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर..
⚡ सावंतवाडी ता.३१-:
सावंतवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवलेल्या थेट नगराध्यक्षा तसेच अकरा नगरसेवकांनी आज अधिकृतपणे स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गट स्थापनेबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सादर करण्यात आले.
या गटाच्या प्रमुखपदी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भविष्यात भाजप पॅनलमधून निवडून आलेल्या नगरसेवकांची कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये, तसेच गटाची एकजूट कायम राहावी, यासाठी राजकीय खबरदारी म्हणून हा गट स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह एकूण अकरा नगरसेवक या गटात सहभागी असून, आगामी काळात नगरपालिकेच्या विकासात्मक कामांसाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
