⚡दोडामार्ग ता.३१-:
लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत भिकेकोनाळ येथे आयोजित सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप २७ डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिरामुळे गावात सामाजिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले.
समारोप कार्यक्रमास एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय खडपकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. प्रथमेश ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना सतीश सावंत यांनी एनएसएस शिबिरे ही विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये व सामाजिक जाणीव देणारी असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी केलेले श्रमसंस्कार आयुष्यभर मार्गदर्शक ठरतील, असे नमूद केले. सात दिवसांत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पथनाट्ये, तसेच शोषखड्डे व बंधारे निर्मितीचे श्रमदान केले.
विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल गवस यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन तनया मणेरीकर यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत गवस यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
भिकेकोनाळ येथे लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा उत्साहात समारोप…
