मनसेच्या गणेश वाईरकर यांचा आरोप..
⚡मालवण ता.२८-:
मालवण बंदर जेटी येथे काँक्रीटचा रस्ता बनविण्यासाठी शासनाने सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा सदर विभागाने ठेकेदाराला पाठीशी घालत मनसेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. पहिल्याच पावसात या रस्त्याचे काँक्रीट वाहून गेल्याने कोट्यावधी रुपयांचा चुराडा संबंधित विभागामार्फत झाला आहे, असा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
मालवण बंदर जेटी रस्त्याचे काम
अंदाजपत्रकानुसार सदर ठेकेदाराकडून होत नसल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वारंवार सूचना केल्या जात होत्या. परंतु ठेकेदाराचे मिंधे असलेले अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्याचे काम मेरीटाईम बोर्ड विभागाने केले आहे. हे काम ठेकेदाराने आपल्या मर्जीनुसार केल्यानेच संपूर्ण रस्त्यावरील करण्यात आलेले काँक्रीट पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे निदर्शसनास आले आहे. या कामात वापरण्यात आलेले स्टील हे सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहे. याची कल्पना देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला, असा आरोप गणेश वाईरकर यांनी केला आहे.
यांदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच भेट घेऊन याविषयी ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच या कामाची तांत्रिक चौकशी सुद्धा करण्यात यावी. त्यामध्ये जर ठेकेदार दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून संबंधित अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे श्री. वाईरकर यांनी म्हटले आहे. याची अंमलबजावणी तात्काळ न झाल्यास मनसेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन पक्षाच्या वतीने छेडण्याचा इशाराही श्री. वाईरकर यांनी दिला आहे.
