मतदानामध्ये वाक्कर १२ मतांनी विजयी..
⚡मालवण ता.२८-:
मालवण तालुक्यातील देवली गावचे सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी केलेल्या मतदानात वाक्कर यांचा विजय झाला. लोकनियुक्त सरपंच म्हणून वाक्कर कार्यरत असल्याने त्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मान्यतेसाठी ग्रामसभेची मान्यता असणे आवश्यक होते, यामुळे मतदान घेण्यात आले. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मालवण तालुक्यात प्रथमच लोकनियुक्त सरपंच यांच्यावरील सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास प्रस्ताव ग्रामसभेतील गुप्त मतदानात ग्रामस्थांनी फेटाळल्याचे चित्र दिसून आले आहे. या ग्रामसभेच्या मतदानाकडे आणि निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते.
देवली सरपंच श्यामसुंदर प्रल्हाद वाक्कर यांच्याविरुद्ध उपसरपंच हेमंत वसंत चव्हाण व अन्य ५ सदस्यांनी २९ एप्रिल रोजी अविश्वास ठराव मालवण तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता. या अविश्वास प्रस्तावावर विचार करण्याकामी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ नुसार ग्रामपंचायतीची विशेष सभा ७ मे रोजी दुपारी १२.३० वा देवली ग्रामपंचायत कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत सरपंच शामसुंदर वाक्कर यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव ६ विरुद्ध १ या बहुमताने मंजूर झाला. संमत/पारित केलेल्या अविश्वास ठरावास विशेष ग्रामसभेची संमती मंजुरी घेण्याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत व गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्याबाबत तरतुद निश्चित केलेली होती. त्यामुळे विशेष ग्रामसभेचे आयोजन २७ मे रोजी करण्यात आले होते. विशेष ग्रामसभेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून प्रफुल्ल वालावलकर यांना प्राधिकृत करण्यात आले होते. विशेष ग्रामसभेचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार करून त्याबाबतचे इतिवृत्त त्याच दिवशी तहसील कार्यालयात सादर करावे, असे निर्देश तहसीलदार यांनी दिले होते.
या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. मुसळधार पाऊस असतानाही देवली ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग नोंदविला. लोकनियुक्त सरपंच यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला संमती आहे किंवा नाही अशाप्रकारची मतपत्रिका तयार करण्यात आलेली होती. या मतपत्रिकेवर बरोबर चिन्हाची फुली मारायची होती. यात ६८४ मतदारांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी मतमोजणी झाल्यावर अविश्वास ठरावाच्या विरोधात ३३५ मते पडली. तर अविश्वास ठरावाच्या बाजूने ३२३ मते पडली. यात २६ बाद ठरली होती. यामुळे सरपंच श्याम वाक्कर यांच्या बाजूने ३३५ मते पडल्याने त्यांचा १२ मतांनी विजय झाला. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास प्रस्ताव देवली ग्रामस्थांनी फेटाळला आहे. यामुळे सरपंच म्हणून वाक्कर हेच कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयी घोषित झाल्याने वाक्कर समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता शासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिले आहे.
हा जनतेचा विजय – श्याम वाक्कर
मी लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झालेलो होतो. माझ्यासोबत सगळ्याच राजकीय पक्षांचा आशीर्वाद होता. यामुळे मी कधीही गावात राजकीय अगर वैयक्तिक राजकारण केले नाही. मी जनतेच्या सेवेत कायम राहण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत जनतेची जेवढी सेवा करणे शक्य आहे, तेवढी करणार आहे. मी माझ्या ग्रामदैवतेला स्मरूण काम करत आहे. याहीपुढे सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे यानिमित्ताने सरपंच श्याम वाक्कर यांनी स्पष्ट केले.
