वरवडे मार्गावरून होणारी ओव्हरलोड चिरे, वाळू वाहतूक थांबवा

ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी..

कणकवली : कणकवली – आचरा मार्ग बंद झाल्याने सध्या पर्यायी मार्ग म्हणून वरवडे गावातून वाहतूक सुरू आहे. मात्र, ही वाहतूक होत असताना चिरे, वाळूची ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे वरवडेतील रस्त्याच्या मोऱ्या व साइडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे पुलावरून वाहतूक सुरू होईपर्यंत चिरे, वाळूची वाहतूक या मार्गात बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, अशी मागणी वरवडेचे माजी उपसरपंच आनंद घाडीगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबत तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन देण्यात आले आहे. यात ओव्हरलोड वाहतुकीमुळे दोन ठिकाणी मोऱ्या खचल्या आहेत. काही ठिकाणी साइडपट्टीही खचली आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक या मार्गाने सुरू राहिल्यास सध्या पर्यायी मार्ग म्हणून वापरात येत असलेला मार्गही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ही ओव्हरलोड वाहतूक बंद करावी व अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आनंद घाडीगावकर, अमोल घाडीगावकर, सुभाष मालंडकर, काका कदम, अभिजित घाडीगावकर आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभू यांनाही देण्यात आले.

याबाबत तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी पावले उचलत, सार्वजनिक बंधिकामच्या उपअभियंता के. के. प्रभू यांच्याशी संपर्क साधला. तसेच मालवण तालुक्यातील चिरेखाणींवरून चिरे वाहतूक होत असल्याने तहसीलदारांशी संपर्क साधला. गोठणे येथील पुलावरून पर्यायी मार्गाने चिरे, वाळू वाहतूक महामार्गाला वागदेत आणण्याच्यादृष्टीने पाहणी करून उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.

You cannot copy content of this page