⚡दोडामार्ग ता.०३-: काही दिवसापूर्वी बांदा येथील वाहन अपघातात परमे येथील श्री दिपक नारायण गवस हे गंभीर जखमी झाले होते. बांदा इन्सुली येथे हा अपघात झाला होता. तेथुन दिपक गवस यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. मात्र वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा एक हात आणि दोन्ही पाय काम करत नाही.उपचार सुरू आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आणण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा जीवनमरणाचा संघर्ष सुरू झाला.
घरी पत्नी व वयोवृद्ध आई असा त्यांचा परिवार आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या कुटुंबाचा आधार अशा पद्धतीने निकामी झाल्यानंतर पूर्ण गवस कुटुंब कोसळले. आधीच गरिबीचे झुंज सुरू होती, आता तर दोन वेळचे जेवण घेण्याचीही आर्थिक परिस्थिती उरली नाही.
अशावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब या संवेदनशील युवा नेतृत्वाच्या कानावर ही गोष्ट गेल्याने ते हळहळले. अस्वस्थ होत त्यांनी तातडीने काही आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या अपघाताच्या प्रकरणी माहिती घेऊन काय मदत करता येईल हे पाहण्याच्या सूचना देखील त्यांनी आपल्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना दिल्या. श्री दीपक गवस यांच्या परिवाराने काळजी करू नये, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी भविष्यात प्रयत्न करण्यात येतील असे श्री विशाल परब यांनी सांगत गवस कुटुंबीयांना धीर दिला आहे.
कोणतेही नातेसंबंध नसताना केवळ माणुसकीच्या नात्याचे ऋणानुबंध मानत श्री विशाल परब हे जणू देवदूताच्या रुपात दीपक गवस यांच्यापर्यंत आर्थिक मदत घेऊन पोहोचले तेव्हा गवस कुटुंबीयांच्या भावनांचा बांध अक्षरशः कोसळला. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांना धीर देत सावरले. श्री विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आर्थिक मदत अपघातात जायबंदी झालेल्या श्री दीपक गवस यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पत्रकार शिरिष नाईक, सरपंच प्रथमेश मणेरीकर, संजय उसपकर,श्रीकांत नारायण गवस, विष्णू आरोसकर, विनोद बिर्जे, शंकर आरोसकर, रजत नाईक, सुनील बिर्जे, सागर नाईक, श्रीराम गावडे, शिवराम बिर्जे, रोशन आरोसकर, नीरज आरोसकर, पत्रकार गोविंद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
