माजी सैनिकांनी वेळेचे महत्त्व आणि शिस्तीचा दिला संदेश

कुडाळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) छत्रपती संभाजी महाराज सभागृहात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चार माजी सैनिकांचा पंचायत समितीच्या सभापती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कसाल येथील विजय नाईक व रामचंद्र जगताप, माणगाव येथील चंद्रशेखर जोशी आणि डिगस येथील सुनील सुर्वे हे माजी सैनिक उपस्थित होते. देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांनी सैन्यदलातील सेवेदरम्यान आलेले अनुभव कथन केले. तसेच जीवनात वेळेचे महत्त्व, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव याबाबत मौलिक विचार मांडले. त्यांच्या अनुभवांतून उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता दीपक गवस, प्रशासन अधिकारी श्रीमती कार्लेकर, सी. डी. परब, डोईफोडे यांच्यासह पंचायत समितीअंतर्गत विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम पंचायत समिती कुडाळच्या वतीने राबविण्यात आला.
