Headlines

वनराई बंधारा अभियानात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांचे श्रमदान…

व्हेळकरवाडी-नाधवडे येथे लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना बळ..

⚡वैभववाडी ता.१४-: जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या वनराई बंधारा अभियानात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी वैभववाडी तालुक्यातील व्हेळकरवाडी-नाधवडे येथे प्रत्यक्ष सहभागी होत श्रमदान केले. लोकसहभागातून पाणी अडविणे, जमिनीत पाणी जिरविणे आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन मिळाले.

पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक उपयोग करून घेणे, वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत संचय करणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या उद्देशाने जिल्ह्यात वनराई बंधारा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून विविध ठिकाणी बंधारे उभारले जात आहेत. जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून लोकसहभागातून गावपातळीवर उभी राहणारी चळवळ आहे. या दृष्टीने प्रत्येक गावाने स्थानिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे व श्रावणी रावराणे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य साधना नकाशे व देवानंद पालंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, भाजप तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सरपंच लीना पांचाळ, ग्रामसेवक रवींद्र गोसावी तलाठी केदारी बागल उपस्थित होते.
नैसर्गिक झऱ्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना*
वनराई बंधारा अभियानातील सहभागानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उंबाळा येथील नैसर्गिक झऱ्याला भेट दिली. हा झरा परिसरातील नागरिकांसाठी बारमाही पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असून, वर्षभर पाण्याची उपलब्धता या स्रोतावर अवलंबून आहे. या नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याची बाब ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयावर बैठक घेऊन झऱ्याचे संवर्धन व सुशोभीकरण तसेच तेथील रस्त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
फोटो नाधवडे येथे वनराई बंधारा बांधताना सहभागी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासूर, सभापती सिद्धेश रावराणे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामस्थ सहभागी फोटो संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page