Headlines

बाजारपेठेतील दुकानाला मध्यरात्री आग; लाखोंचे नुकसान

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची घटनास्थळी भेट; नुकसानग्रस्ताला मदतीचे आश्वासन..

⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी बाजारपेठेतील संजीव निपाणीकर यांच्या दुकानाला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील साहित्य व वस्तू जळून खाक झाल्या. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या दुर्घटनेत सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
आगीची घटना लक्षात येताच शेजारील दुकानातील बाळू वेंगुर्लेकर यांनी तातडीने बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सतर्कतेमुळे आग अधिक पसरून मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी निपाणीकर यांच्या दुकानाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या कठीण प्रसंगी भारतीय जनता पार्टी, प्रशासन तसेच समाजबांधवांच्या माध्यमातून संजीव निपाणीकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून, त्यांना जास्तीत जास्त शासकीय व इतर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बाजारपेठेतील व्यापारी व नागरिक उपस्थित होते. घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंता व्यक्त करण्यात आली असून, आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page