देविदास पवार:बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार..
⚡मालवण ता.१३-: आज दहावी बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सेवांगणतर्फे झालेला गुणगौरव कौतुकास्पद उपक्रम आहे. इस्रो सारख्या अंतराळ क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या संस्थेत एखादा प्रकल्प करताना शंभर टक्के अचुकता आवश्यक असते. तरच प्रकल्प यशस्वी होतात. आजच्या विद्यार्थ्यानी देखील आपल्या क्षेत्रात असेच जिद्दीने शंभर टक्के यश मिळवावे, असे प्रतिपादन इस्त्रोचे सेवानिवृत अधिकारी देविदास पवार यांनी कट्टा येथे बोलताना केले.
बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्या वतीने कट्टा, वराड, चौके, तळगाव पेंडूर येथील हायस्कूल मधील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना देविदास पवार हे बोलत होते. यावेळी प्रोग्रेस हायस्कूल, पणजीच्या माजी मुख्याध्यापिका शोभा म्हाडगुत, रश्मी पाटील, बापू तळावडेकर, किशोर शिरोडकर, शैलेश खांडाळेकर, श्री. हडलगेकर, संजय आचरेकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, विद्याधर चिंदरकर, सुजाता पावसकर आदी मान्यवर उपास्थित होते.
यावेळी दहावी, बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तन्वी केदार म्हाडगुत हिचा
विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब मुंबई माहिम यांच्या वतीने तीन गुणवंत मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. तर सेवांगणच्या शिक्षण निधीतील ३८ विद्यार्थ्याना शिक्षणनिधीचे वितरण करण्यात आले.
दीपक भोगटे यांनी प्रास्ताविकात सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शोभा म्हाडगुत यांनी मुलांचे कौतुक करत विद्यार्थ्यानी आपले यश असेच टिकवून ठेवावे, असे सांगितले. रश्मी पाटील यानीही मुलाना मार्गदर्शन करत दहावी बारावीत मिळालेल्या गुणांनी भूलून न जाता पुढेही परिश्रम करत राहावे, असे सांगितले. श्री. नांदोसकर यानीही विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. तर तन्वी म्हाडगुत हिने आपल्या यशात शिक्षक व पालकांबरोबरच सेवांगणचा सुद्धा वाटा आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन सेवांगण कट्टा शाखेच्या कार्यवाह वैष्णवी लाड यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
