धीरज परब: गृहमंत्र्यांचे
वेधले लक्ष..
⚡कुडाळ ता.१३-: येत्या १९ जून ते १ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील १४२ कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, याच कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वारे सह अतिवृष्टी होत असते. त्यामुळे मैदाने क्रीडा प्रकार घेण्यायोग्य राहत नाहीत. याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
धीरज परब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, येत्या १९ जून ते १ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील १४२ कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार हे. हा काळ अतिवृष्टीचा असतो. त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या नियमानुसार १०० मीटर रनिंग, १६०० मीटर रनिंग, गोळा फेक यासारखे मैदानी प्रकार अनिवार्य असतात. या मैदानांमधे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिखल व पाणी साचलेले असु शकते. अशा मैदानी प्रकारात सेकंद आणि मिलीमीटरपण खुप महत्वाचे मानले जातात. पावसाळ्यात हे सर्व तपासणे आणि सादर करणे जिकीरीचे होण्याची शक्यता आहे. शिवाय भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येत उमेदवार सामील होतात त्यांनासुद्धा मोठी अडचण होण्याची शक्यता वाटते. तरी या सर्व गोष्टींवर गांभीर्यपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करुन मार्ग काढावा. अशी विनंती धीरज परब यांनी निवेदन अर्जात केली आहे.
