लोकसभेच्या एका पराजयाने शिवसैनिक खचलेला नाही…

बाबी जोगी: वैभव नाईकांची मतदारसंघात जायंट किलर म्हणूनच ओळख…

⚡मालवण ता.११-: लोकसभेतील एका पराजयाने शिवसैनिक खचलले नाहीत तर नव्या उमेदीने येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या आमदार वैभव नाईक यांची ही ओळख शिवसैनिक, मतदार जनता निश्चितच ठेवेल आणि त्यांना मंत्रीही बनवतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदारांची काळजी करू नये अशी टीका उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला. अशात केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवाराला शहरातून मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे अपयश म्हणावे लागेल. जास्त मताधिक्य मिळविण्यापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी रोखण्यात यश मिळविले आहे. आमच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी या पराजयाने खचून न जाता येणाऱ्या पुढील निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत.

लोकसभा निवडणुकीतील विजयाने विरोधकांनी हुरळून जाऊ नये. कारण या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला.

आमदारांच्या माध्यमातून या मतदार संघात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनता विरोधकांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल. सर्व शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांना कुडाळ मालवण मधून निवडून आणतील आणि महाराष्ट्रात मंत्री बनवतील ही काळ्या दगडावरची
रेघ आहे. मालवण कुडाळ मधील जनतेला सुद्धा आमदार वैभव नाईक यांना मंत्री झालेले पाहायचे आहे. त्यामुळे या एका पराजयाने आमदारांवरती टीका करणाऱ्यांनी प्रथम आमदारांचा इतिहास पाहावा. राज्यात जायंट किलर म्हणून आमदारांची ओळख आहे ती त्यांची ओळख शिवसैनिक, मतदार जनता तशीच ठेवेल आणि मंत्रीपदावरती विराजमान करतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदार नाईक यांची काळजी करू नये. त्यांची काळजी घेण्यास शिवसैनिक, जनता समर्थ आहे असेही श्री. जोगी यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page