⚡मालवण ता.०१-: पावसाळ्या पूर्वी गटार खुदाई व ओढे, नाले, सफाई पूर्ण होणे गरजेचे असताना मालवण शहरात मात्र पाऊस तोंडावर आला तरी गटार खुदाईचे काम संथ गतीने सुरु असून अद्यापही शहरातील अनेक भागातील गटारे व नाले यांची साफसफाई करणे बाकी आहे. वस्तुतः हवामान विभागाने जिल्ह्यात दि. २ ते ४ जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जाहीर करीत मान्सूनचे आगमन चार जूनला होणार असल्याची शक्यता वर्तवली असताना गटार खुदाई न झालेल्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवण नगरपालिकेच्या गटार खुदाईच्या संथ कामगिरीवर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात सध्या गटार खुदाई व सफाईचे काम नगरपालिकेकडून सुरु आहे. पावसात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. या दृष्टीने मातीने बुजलेल्या तसेच कचऱ्याने भरलेल्या गटारांची व नाल्यांची खुदाई व सफाई करणे आवश्यक आहे. जून महिना उजाडला तरी नगरपालिकेकडून गटार खोदाईचे काम सुरु आहे. शहरातील निम्म्यापेक्षा जास्त भागातील गटारांची सफाई करणे अद्याप बाकी आहे. मान्सून केरळ मध्ये दाखल झाला असून येत्या काही दिवसात लवकरच कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. अशातच हवामान विभागाने २ ते ४ जून या कालावधीसाठी जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. असे असताना शहरातील गटारांची खुदाई पूर्ण न झाल्याने मोठा पाऊस कोसळल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काही वर्षात मालवण शहरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र यातून नगरपालिकेने कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. जून महिन्यापूर्वी गटारे व नाल्यांची खोदाई व सफाई होणे आवश्यक असताना शहरात अजूनही हे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे
