मालवण पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन..
⚡मालवण ता.०१-: लोकसभा निवडणुकीचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर होणार असून निकालानंतर सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त किंवा कोणाच्या भावना दुखावणाऱ्या टिप्पणी अथवा पोस्ट करू नयेत, घोषणाबाजी किंवा विजयी मिरवणूक काढू नये. सोशल मीडियावरील एखाद्या पोस्ट मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यसह संबंधित सोशल मीडिया ग्रुपच्या ऍडमिनला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मालवण पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मालवण मधील नागरिकांना दिला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दि. १६ मार्च ते दि. ६ जून २०२४ पर्यंत आदर्श आचार संहिता अंमलात आहे. सिंधुदुर्ग जिल्हयासह संपूर्ण देश भरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणुक निकाल जाहिर झाल्या नंतर सोशल मिडीयाव्दारे, फेसबुक, इंस्टाग्राम, बाट्सअॅप, गृप व इतर तत्सम ऍप्लीकेशनच्या माध्यमाव्दारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, वर्माच्या, धार्मीक भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार करु नयेत, तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये, डिजे किंवा इतर ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये. तसेच विजय मिरवणूक काढू नये. तसेच व्हाट्सऍपग्रुपच्या ऍडमिन यांनी दि. ३ ते ६ जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटींगमध्ये Only Admin असा बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही. जर ऍडमिन यांनी सेटींग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यानी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या प्रसिद्धीपत्रकात मालवण पोलीस ठाण्यातर्फे म्हटले आहे.
