बाबा मोंडकर: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता स्वतःहून परिवर्तन घडविण्यासाठी तयार..
मालवण (प्रतिनिधी)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या समोरील प्रतिस्पर्धी उमेदवार विनायक राऊत हे महायुती मधून निलंबित केलेले अपक्ष उमेदवार आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी करत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणूक ही एकतर्फी होऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे हेच संसदेवर निवडून जातील, असा विश्वास मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
मालवण येथील भाजप कार्यालयात बाबा मोंडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, रविकिरण तोरसकर, पूजा सरकारे, विजय केनवडेकर, सूर्यकांत फणसेकर, मंदार लुडबे यांसह इतर उपस्थित होते.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता नारायण राणे यांच्या विजयासाठी आणि स्वतःहून परिवर्तन घडविण्यासाठी तयार आहे. गेली अनेक वर्षे या मतदार संघातून भाजप शिवसेना महायुतीचाच खासदार निवडून येत असून यावेळी देखील महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण राणे हे निवडून येतील. उबाठा नावाचा पक्ष मशाल हे अपक्ष चिन्ह घेऊन आहे. तरीही जनता भाजप महायुतीच्या पाठीशी आहे. आमच्या चारशे पार या नाऱ्यात दम आहे. अपक्ष उमेदवार विनायक राऊत हे काय नारा देणार ? ज्या पक्षाचे दोन डझन होतील एवढेही खासदार नाहीत अशा अपक्ष पक्षाचे ते उमेदवार आहेत. विनायक राऊत हे केवळ मतदार संघातील वातावरण कलुषित करण्याचे काम करू शकतात. मतदार संघाला दिशा देण्याचे काम ते करू शकत नाहीत. आज देश विकासाच्या दिशेने जात असताना त्या दिशेने हा मतदार संघ नेण्यासाठी एकही भरीव काम विनायक राऊत यांनी या मतदार संघात केलेले नाही, अशी टीकाही मोंडकर यांनी केली.
महायुतीकडे लोक सकारात्मक दृष्टीने आणि एका वेगळ्या अपेक्षेने बघत आहेत. देशात विकासासाठी भाजपने पुढाकार घेतला. नारायण राणे यांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते दिले. राणे यांनी त्या माध्यमातून या मतदार संघाला झुकते माप देत निधी दिला. उद्धव ठाकरे व मंडळी यांनी निवडणुकीसाठी दिलेला अजेंडा हा भारत देशाचा अजेंडा होऊ शकत नाही. ही काही नगरपालिकेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाची आहे, देशाला विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या मतदार संघातील लढत ही अपक्ष उमेदवार व सत्तधारी उमेदवार अशीच होणार आहे. या मतदार संघांचे प्रश्न, भूमिका संसदेत ठामपणे मांडणारा खासदार येथील जनतेला हवा आहे. म्हणूनच सुज्ञ जनता नारायण राणे यांना निवडून देऊन संसदेत पाठवेल, असेही बाबा मोंडकर म्हणाले.
