भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांची मागणी:मोपा विमानतळाचा विसर्ग वाढविल्याने बांधा येथे पाण्याची टंचाई..
बांदा ता.१९-:
वाढत्या पाण्याच्या मागणीनुसार मोपा (गोवा) येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. याचा परिणाम बांदा शहर ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेवर झाला आहे. शहरातील खासगी विहिरीच्या पाणी पातळीत देखील मोठी घट झाल्याने परिसरात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्याची पाहणी करत तिलारी कालवा विभागाने तात्काळ पाण्याचा विसर्ग न वाढविल्यास कालव्यात बसून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तिलारीच्या बांदा शाखा कालव्यात डिसेम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेतर्डे येथून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी पाणी लवकर सोडण्यात आल्याने कालव्याच्या ४२ किलोमीटर क्षेत्रात पाणी वेळेत पोहोचले. यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने बांदा शहर व लाभ क्षेत्रातील विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती.
बांदा ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेला देखील याचा फायदा झाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून कालव्यात सोडण्यात आलेले पाण्याचा विसर्ग अचानक कमी करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याअभावी बांदा शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच पाणी नसल्याने या परिसरातील बागायती देखील करपून गेली आहे.
