Headlines

फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा..

लाखो निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन; इतिहासातून शिकून राष्ट्र अधिक भक्कम करण्याचे विशाल परब यांचे आवाहन..

⚡बांदा ता.१४-: भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ म्हणून फाळणीच्या काळातील वेदनादायी स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मरणात ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपा राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या असंख्य निरपराध नागरिकांना विनम्र अभिवादन केले.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो कुटुंबांना आपल्या मातृभूमी, घरदार आणि आप्तस्वकीयांपासून तुटून अनोळखी भूमीकडे स्थलांतर करावे लागले. या काळात असंख्य निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. फाळणी ही केवळ भूभागाची विभागणी नव्हती, तर लाखो माणसांच्या आयुष्यावर उमटलेली खोल जखम होती, अशी भावना परब यांनी व्यक्त केली.
फाळणीच्या काळातील वेदना, संघर्ष, त्याग आणि बलिदान विसरता कामा नये. इतिहासातील या काळ्याकुट्ट अध्यायातून एकता, बंधुभाव, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश घेऊन पुढे जाणे हीच त्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

‘इतिहास विसरायचा नसतो; त्यातून शिकून राष्ट्र अधिक भक्कम करायचे असते,’ असे सांगत अखंड भारताची एकता, मानवतेचे रक्षण आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन विशाल परब यांनी केले.

You cannot copy content of this page