Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचेविकास संस्था अधिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय : श्री. मनीष दळवी…

⚡वेंगुर्ला ता.१४-: विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था हा सहकार व्यवस्थेचा पाया असून, या संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. विकास संस्थांनी केवळ कर्जवाटप व वसुलीपुरते मर्यादित न राहता विविध व्यवसाय सुरू करून सभासद शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
वेंगुर्ला येथे प्राथमिक विकास संस्था संवाद कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रविंद्र मडगांवकर, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, प्रकाश गडेकर, नगरसेवक दाजी परब, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष प्रज्ञा परब, सहकार अधिकारी श्री.चौगुले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल आदी उपस्थित होते.या मेळाव्यात ३० जून अखेरपर्यंत वसुलपात्र बँक कर्जाची १०० टक्के वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सातेरी विकास संस्था वेतोरे, मातोंड विकास संस्था, सोमेश्वर विकास संस्था आडेली, स्वयंभू विकास संस्था मठ, क्षेत्रपालेश्वर विकास संस्था होडावडा, गिरेश्वर विकास सोसायटी वजराट, अणसुर विकास सोसायटी, सिध्देश्वर विकास सोसायटी खानोली, आसोली विकास सोसायटी, म्हापण विकास सोसायटी, कोचरा विकास सोसायटी, पाल विकास संस्था, वेंगुर्ला विकास संस्था, मोचेमाड विकास संस्था, केळुस विकास संस्था, उभादांडा विकास संस्था, रेडी विकास संस्था, दाभोली विकास संस्था, आरवली विकास संस्था अशा एकूण १९ विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा सन्मान मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच १०० टक्केच्या जवळपास वसुली साधलेल्या विकास संस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, सचिव व संचालक यांचाही सत्कार करण्यात आला. मनीष दळवी म्हणाले की, काही विकास संस्थांनी संस्थास्तरावर १०० टक्के कर्जवसुली साध्य केली आहे. या चांगल्या पायंड्याचा विस्तार करून जिल्ह्यातील सर्व विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचे उद्दिष्ट साध्य करावे. शेतकरी हा विकास संस्थेच्या कारभाराचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि संस्थांचा कारभार पारदर्शक व गतिमान असणे आवश्यक आहे.
विकास संस्थांच्या कारभारात सचिवांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांना योग्य वेतन मिळावे यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. केडरच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या सचिवांना किमान १७ हजार रुपये वेतन, तर ज्येष्ठ सचिवांना सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षे बँक स्वतःच्या उत्पन्नातून दरवर्षी सुमारे ९० लाख रुपये सचिवांच्या वेतनासाठी खर्च करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी अधिकाधिक व्यवहार विकास संस्थांमार्फत करावेत, यासाठी सर्व प्रकारची कर्जे संस्थांच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थेट बँकेपेक्षा एक टक्का कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, संस्थेतील शेअर रक्कम १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आली आहे.
कर्जप्रक्रिया अधिक जलद करण्यासाठी डिजिटल प्रणाली व ‘सुगी’ ॲपच्या माध्यमातून सात दिवसांत कर्ज मंजुरीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भविष्यात मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्ज उपलब्ध करून देण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच लाख रुपयांपर्यंत ‘बळीराजा कृषी कर्ज योजना’ राबविण्याचा प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्जाचा उपयोग करण्याची मुभा देण्याचा उद्देश आहे.शेतकऱ्यांनी वेळेत कर्जफेड केल्यास व्याज सवलत, पुढील कर्जाची पात्रता व पीक विमा यांसारखे फायदे मिळतात. त्यामुळे विकास संस्थांनी १०० टक्के कर्जवसुलीचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
विकास संस्थांनी आंबा, काजू, भात खरेदी केंद्र, दूध संकलन, पशुखाद्य विक्री, CSC सेंटर, पिग्मी कलेक्शन यांसारखे विविध व्यवसाय सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक तालुक्यात ‘सहकार बाजार’ उभारण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेचा व्यवसाय पाच वर्षांत ४,०२१ कोटींवरून ७,५०० कोटींवर गेला असून, डिसेंबरपर्यंत ८,००० कोटींचा टप्पा गाठण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२८ पर्यंत १०,००० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, कर्ज विभाग प्रमुख के. बी. वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर, विकास अधिकारी हर्षल मर्गज, वेंगुर्ला शाखा व्यवस्थापक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास तालुक्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page