१५ रोजी वीरभक्त तरणीसेन, तर १६ रोजी रावण मंदोदरी विवाह:लाजरी क्रिकेट ग्रुपचे आयोजन..
कुडाळ : दशावतारातील दर्जेदार पौराणिक नाटकांची मेजवानी दशावतार नाट्य रसिकांना देणारा आणि सर्वांना उत्कंठा लागून राहिलेला कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपचा ‘मान्सून महोत्सव-२०२६ ‘ येथील सिद्धिविनायक सभागृहात १५ व १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे चौदावे वर्ष आहे. यात दशावतार लोकलेतील आघाडीच्या निवडक कलाकारांच्या संचात १५ ऑगस्ट रोजी ‘वीरभक्त तरणीसेन”‘, तर १६ रोजी “रावण मंदोदरी विवाह” नाटक होणार आहे.
सन २०१२ पासून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. ऐन पावसाळ्यातही दशावतारी नाटकासाठी रसिक उत्स्फूर्तपणे प्रचंड गर्दी करतात आणि आस्वाद घेतात याची प्रचिती या महोत्सवामुळे आली. या महोत्सवानंतर सिंधुदुर्गसह अन्य भागातही पावसाळ्यात संयुक्त दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगांचा जणू पाऊस पडायला सुरुवात झाली. सिंधुदुर्गसह मुंबईत संयुक्त मंडळाची नाटके दणक्यात सुरू असतात.अलीकडच्या वर्षातील पावसाळी हंगामातील संयुक्त नाटकांची आकडेवारी पाहता सन २०२३ मध्ये ११५, सन २०२४ मध्ये १००, सन २०२५ मध्ये ९५ अशी नाटके सादर झाली, तर यावर्षी सन २०२६ मध्ये आतापर्यंत ८५ च्या जवळपास नाटके सादर झाली. खरोखरच या कलेला चांगले दिवस आले. याचे श्रेय लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाला द्यावे लागेल.
या महोत्सवात आतापर्यंत ‘वीर अभिमन्यू’, ‘द्रौपदी – वस्त्रहरण’, ‘सती चंद्रसेना’, ‘लव-कुश’,’भीष्म प्रतिज्ञा’, ‘अश्विनी उद्धार’, ‘नंदी संग्राम’, ‘कृष्ण-सुदाम भेट’,’वीर बब्रुवाहन’, ‘प्रतिकृष्ण’, ‘दक्षयज्ञ’, ‘इंद्रजीत वध’, ‘उषा स्वप्न बाणासूर’, ‘ब्रह्मतेज’, ‘इंद्रभक्त इंद्रभानू’, ‘महारथी कर्ण’ ” “महायोद्धा इरावन” ,”थाळी हरण ” अशी पौराणिक एकापेक्षा एक नाटके रसिकांना मेजवानी ठरली आहेत. दशावतारी कलाकारांप्रमाणेच भजनी, नृत्य कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लाजरी क्रिकेट ग्रुपचे प्रयत्न असतात. पावसाळा सुरू होताच. दशावतार रसिकांना या महोत्सवाचे वेध लागतात. आता अवघ्या दोन दिवसावर हा महोत्सव ठेपला आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० ‘वीरभक्त तरणीसेन”‘, संयुक्त दशावतार कलाकारांच्या संचात’ नाटक होणार आहे. यात गणपती-प्रतिक कलिंगण, मकराक्ष – सुहास( मामा) माळकर, दत्तप्रसाद शेणई, तरणीसेन – सागर गावकर, रावण – सिताराम ( बाबा) मयेकर, माता सरमा – सुधीर तांडेल, शैलुष – मोरेश्वर सावंत, श्रीराम – दत्तप्रसाद शेणई ,लक्ष्मण -गौरव शिर्के, मोरेश्वर सावंत, मारुती – प्रशांत मयेकर, विभीषण – महेंद्र कुडव , सुग्रीव- सुयश ठाकुर या कलाकारांचा समावेश आहे, तर हार्मोनियम- पप्पू घाडीगावकर , पखवाज- किसन नेमळेकर , झांज – हरेश नेमळेकर यांची संगीतसाथ आहे.
१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संयुक्त दशावतार मंडळाच्या संचात ”रावण मंदोदरी विवाह” नाटक होणार आहे. यात गणपती- प्रतिक कलिंगण,शंकर – अक्षय सातार्डेकर, इंद्र – साहील तळकटकर,चंद्र – जयराम बाणे, विभीषण – गिरीश राऊळ, वाली – दत्तप्रसाद तवटे, मयासुर-रोहित नाईक, रावण – संजय काळे, नारद – सागर हनपाडे, हेमा अप्सरा – पवन वालावलकर, पार्वती – सिद्धेश मुणनकर, मधुरा / मंदोदरी – यश जळवी, वैदूबाई – श्रीराम साईल आदी कलाकार आहेत. हार्मोनियम – आशिष तवटे , पखवाज – राजेश ( दादा) आकेरकर , झांज – बाबू कोरगावकर यांची संगीत साथ आहे. या दोन्ही नाटकांची कथा संकल्पना अजित गाडगीळ यांची आहे. या नाटकांसाठी कलेश्वर दशावतार मंडळ (सुधीर कलिंगण प्रस्तुत, नेरुर) यांचे विशेष सहाय्य लाभणार आहे. नाट्यरसिकांनी याचा आनंद लुटावा, असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर व या ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर तसेच ग्रुप सदस्यांनी केले आहे.
