Headlines

गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत न ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडू

मालवण पं. स. सभेत वीज विभागाला इशारा

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यात सुरु असलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामात खोदाईचा भाग बुजविण्यासाठी वाळू ऐवजी खडीची म्हणजे क्रशरची पावडर टाकली जात आहे, यामुळे हे काम चुकीच्या पद्धतीने होत असून या कामावर वीज वितरण विभागाचे कोणतेही लक्ष नाही असा आरोप पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण यांनी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करत वीज अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच गावागावात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढत असून गणेश चतुर्थी सणात वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बंडू चव्हाण यांनी यावेळी दिला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, मानसी भोगावकर, रिया बावकर, माधुरी मसुरकर, संतोष गावडे, दीपक सुर्वे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. नवीन होऊ घातलेल्या शिक्षक भरतीत तालुक्याला जास्तीत जास्त शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशा मागणीचा ठराव घेण्यात आला.

या सभेत तोंडवळी गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गणेश तोंडवळकर यांनी उपस्थित करत मागील तीन सभांमध्ये या विषयावर चर्चा केली जात असतानाही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगितले. यावेळी उपस्थित तोंडवळी सरपंच आबा कांदळकर यांनी वनविभागाच्या परवानगी अभावी ६३० मीटरच्या भागात गेल्या तीन वर्षांत खोदाई झालेली नाही, यासाठी वीज महावितरणने आवश्यक प्रस्तावच वनविभागाकडे न पाठविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या पायलट प्रोजेक्ट मध्ये या गावाचा समावेश असताना गेली तीन वर्षे हे काम रखडले आहे, असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही महावितरणकडून कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही, असे स्पष्ट केले. यावर आचरा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत वनविभागास प्रस्ताव सादर करून तोंडवळी गावात वीज पुरवठा सुरू करावा असा आदेश सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गदर्शक फलक बसविले जातील असे आश्वासन दिले गेले. मात्र चार बैठका होऊनही त्याची कार्यवाही न झाल्याने पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळपर्यंत फलक बसविला जाईल असे स्पष्ट केले. मालवण बेळणे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. जानेवारी महिन्यात भरलेले खड्डे जून महिन्यातच पुन्हा उखडले आहेत. आता गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याची कार्यवाही तत्काळ व्हावी, अशी मागणी बंडू चव्हाण यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे का? याची पाहणी करण्यात यावी. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घेण्यात याव्यात यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य घ्यावे अशी मागणी सदस्य संतोष गावडे यांनी केली. शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी एक्वागार्ड मशीन बसविण्याची तरतूद करण्यात यावी असा ठरावही यावेळी घेण्यात आला. ग्रामसभेचे निमंत्रण त्या त्या ग्रामपंचायतीने पंचायत समिती सदस्यांना द्यावे अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या. लाखो रुपये खर्च करून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. मात्र सद्यस्थितीत या इमारतीला गळती लागली आहे. त्याची दुरुस्ती केव्हा होणार असा प्रश्न सदस्य दीपक सुर्वे यांनी उपस्थित केला. यावर येत्या चार दिवसात हे काम पूर्ण करून घेतले जाईल असे बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आचरा पशु वैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचीही दुरवस्था झाली असून गळतीमुळे डॉक्टरांनाही तेथे बसणे मुश्किल झाले आहे. याबाबतची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पंचायत समितीसाठी नियुक्त झालेल्या कनिष्ठ अभियंत्यावर कोणताही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येऊ असा ठराव सभेत घेण्यात आला. तालुक्यातील घरकुलची कामे रखडली आहेत. ही कामे संबंधित कनिष्ठ अभियंत्याने पूर्ण करून घ्यावीत असे संतोष गावडे, बंडू चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page