Headlines

तपस्वी मयेकर यांनी मालवण शहराची नाहक बदनामी करू नये…

नगराध्यक्षा ममता वराडकर:वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार असताना ही कामे का नाही पूर्ण करू शकले..?

⚡मालवण ता.१४-:
उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर हे मालवण शहरातील प्रलंबित कामांवरून व्हिडीओ बनवून आम्हा सत्ताधाऱ्यांवर टीका करत उपोषणास बसण्याचा इशारा देत आहेत. मात्र आम्हाला नगरपालिकेत सत्तेत येऊन आठ महिनेच झाले असून नळपाणी योजना, भुयारी गटार, भाजी मार्केट ही कामे तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्याच काळात रखडली आहेत, वैभव नाईक ही कामे का नाही पूर्ण करू शकले, त्यावेळी तपस्वी मयेकर यांनी आवाज का नाही उठविला असे सवाल मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उपस्थित करत मयेकर यांनी मालवण शहराची नाहक बदनामी करण्याचे व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करू नये, असा इशारा दिला आहे.

मालवण नगरपालिकेत नगराध्यक्षा दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, महेश कोयंडे, नगरसेविका नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा सौ. वराडकर म्हणाल्या, विरोधी नगरसेवक तपस्वी मयेकर आज पाणी पुरवठा, भुयारी गटार योजना, भाजी मार्केट, स्वच्छता कर्मचारी वसाहत ही कामे रखडल्याचे खापर आमच्यावर फोडून टीका करत आहेत. मात्र ही सर्व कामे माजी आमदार वैभव नाईक यांच्याच काळातील आहेत. त्यावेळी तपस्वी मयेकर यांच्या आई तृप्ती मयेकर या देखील नगरसेविका होत्या. वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार असताना ही कामे का नाही पूर्ण करू शकले? त्यानंतर चार वर्षे नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात होती. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या योजना रखडल्या. त्यावेळी तपस्वी मयेकर यांनी आवाज का नाही उठविला, आम्ही सत्तेत येऊन आठ महिनेच झाले असून विकास कामे मार्गी लावण्याचा तसेच मालवण शहराचे नाव कुठेही खराब होता नये यासाठी प्रयत्न करत आहोत. अशावेळी मयेकर यांनी व्हिडीओ बनवून लोकांची दिशाभूल करून मालवणची बदनामी करू नये, असेही सौ. वराडकर म्हणाल्या.

आमदार निलेश राणे आमदार झाल्यापासून तसेच आम्ही सत्तेत आल्यावर प्रशासन योग्य पद्धतीने काम करत आहे. शहरातील कचरा योग्य पद्धतीने उचलला जात आहे. कचऱ्याविषयी नागरिकांची एकही लेखी तक्रार नगरपालिकेकडे आलेली नाही. मात्र आम्ही सत्तेत येण्यापूर्वी प्रशासनाच्या काळात व वैभव नाईक आमदार होते त्या काळात शहरातील कचरा उचल करण्याचे काम कसे चालू होते हे जनता जाणून आहे असेही सौ. वराडकर म्हणाल्या.

गेल्या आठ महिन्यात आमदार निलेश राणे यांनी मालवण शहर विकासासाठी २२ कोटीचा निधी आणला. या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिले आहे. जनतेचा विश्वासाचे सार्थक करण्याचे काम आम्ही आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून करत राहू, असेही सौ. वराडकर म्हणाल्या.

You cannot copy content of this page