मन जुळविण्यासाठी समन्वय बैठकांचा उपयोग…

दिपक केसरकर:महायुतीची पक्षांच्या समन्वय बैठक संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.१६-: महायुतीत खालच्या स्तरावर समन्वय होणे फार महत्वाचे असते. त्यांची मन जुळवण्याच्या दृष्टीने या समन्वय बैठकांचा फार उपयोग होतो. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजप मिळून आम्ही ७० टक्के आहोत. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज हा १९ तारीखला भरला जाईल. ज्यावेळेला दोन उमेदवार इच्छुक असतात त्यावेळी सगळ्यांची मन राखण यात वेळ जातो. मात्र एकमताने ही निवडणूक लढवून जिंकली जाईल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), मनसे, आरपीआय या महायुतीतील पक्षांच्या समन्वय बैठका संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील पंचायत समिती गटनिहाय संपन्न झाल्या. यावेळी वेंगुर्ला शहराची महायुतीची समन्वय बैठक १५ एप्रिल रोजी  येथील सप्तसागर अपार्टमेंट येथे संपन्न झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेश सचिव एम.के.गावडे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन सदस्य दिलीप गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर प्रमुख उमेश येरम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुषमा खानोलकर, महिला आघाडी अध्यक्ष सुजाता पडवळ, राष्ट्रवादीच्या प्रज्ञा परब, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शिवसेना महिला तालुका संघटिका प्राची नाईक, तालुका संघटक बाळा दळवी, अल्पसंख्यांक महिला संघटिका शबाना शेख, माजी सभापती सारिका काळसेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शहरप्रमुख संतोष परब, वसंत तांडेल, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, बाबली वायंगणकर, भूषण आंगचेकर, भूषण सारंग, पप्पू परब यांच्यासहित महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले की, ज्या ठिकाणी महायुतीच्या समन्वय बैठका होत आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या मतदार संघातून जो महायुतीचा उमेदवार विजयी होईल त्या उमेदवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्रिमंडळात घेतील एवढे मोठे मताधिक्य दिले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा. यावेळी एम.के.गावडे, बाळू देसाई, सचिन वालावलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
You cannot copy content of this page