वायरी येथील केळबाई देवीचा जत्रोत्सव उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.१६-: मालवण वायरी येथील जागृत देवस्थान कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रौत्सव आज मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा झाला. या जत्रोत्सवास हजारो भाविक तसेच मुंबई चाकरमानी सहभागी झाले होते.

वायरी येथील केळबाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त रविवार दि. १४ एप्रिल पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. १४ एप्रिल रोजी सायंकाळी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ७ वाजता बुवा भगवान लोकरे यांचे दत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई विरुद्ध बुवा प्रमोद हर्याण यांचे पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ मुंबई यांचे डबलबारी भजन झाले. सोमवारी १५ रोजी सकाळी ८ वाजता समुद्र स्नानाकरिता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक संपन्न झाली. त्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर केळबाई देवीला कलशस्नान व पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा, श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ रेकॉर्ड डान्स सादर झाले. तसेच केळबाई देवी मंदिरात रक्तदान शिबीर आणि मंडळाच्या वतीने व डॉ. अनिता आशिष मयेकर, मुंबई यांच्या सहकार्याने वैद्यकीय शिबीर संपन्न झाले.

तर आज मंगळवारी केळबाई देवीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी श्री मूर्तीवर पंचामृत अभिषेक व स्नान, दुपारी होम हवन आदी धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी वायरी व मालवण येथील भाविकांसह चाकरमानी यांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत नवस बोलले व फेडले. दुपारी चैत्र शुद्ध अष्टमी प्रसाद, सायंकाळी स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम सादर झाला. रात्रौ आई केळबाईची आरती, मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा तसेच दत्त माऊली दशावतार मंडळ, दाभोली वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक सादर झाले.

You cannot copy content of this page